05/10/2024
● शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती प्रियंका ●
◆ खो-खो खेळातील नवदुर्गा क्रमांक २ : प्रियंका इंगळे ◆
मन, मेंदू आणि अफाट सरावाचा मेळ म्हणजे खेळ खो-खो. इयत्ता पाचवीत असताना लाल मातीत उतरण्याचा घेतलेला निर्णय तिला आज महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरी पर्यंत घेऊन गेला. ती प्रियंका हनुमंत इंगळे आहे आपली खो-खो खेळातील दुसरी नवदुर्गा. सध्या ती आयकर विभागामध्ये कर सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. नुकतीच तिची राजपत्रित क्रीडा अधिकारी पदी देखील थेट निवड झाली आहे.
घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांचा गाड्यांचा व्यवसाय तर आई घर सांभाळत असे. वडिलांचा व्यवसाय गाड्यांचा होता पण त्या गाड्यांच्या चाकांचा वेग प्रियंकाच्या पायी होता असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कारण आळंदीच्या श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाच्या मैदानावर खो-खो हाच खेळ तिने निवडला. ज्या खेळामध्ये कधी तुमची वेगाशी स्पर्धा असते तर कधी हवेत झेपावत वेगालाही आव्हान द्यायचे असते. शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत असताना रोज मैदानावरती खो-खो या खेळाचा सराव चालायचा. शाळा सुटली की घरी न जाता प्रियंका तो सराव रोज पाहत असे. आपणही या मैदानावर उतरलं पाहिजे, मैदान गाजवले पाहिजे हा विचार मनात आला अन तिने आयुष्यातला पहिला खो दिला, ते वर्ष होते २००९ !
सुरुवातीला खो-खो हा खेळ खेळत असताना प्रियंकाच्या घरच्यांना खो-खो खेळाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे त्यावेळेस थोडाफार का होईना पण घरच्यांचा नकार असायचा. पण अंगी चपळता असल्याने खो-खो हा खेळ कधी तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला हे तिलाही समजले नाही. लवकर बाद न होणारी आणि खांबावर अचूक गडी टिपणारी खेळाडू म्हणून तिची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली. आपली मुलगी मैदान गाजवतेय हे जेंव्हा आई वडिलांच्या लक्षात आले तेव्हापासून घरच्यांचा खेळासाठी पाठिंबा खूप वाढला. २०१३-१४ साली १४ वर्षे वयोगटातील स्पर्धेत 'सर्वोत्कृष्ट खेळाडूचा इला पुरस्कार' ही खो-खो खेळातील तिची पहिली मुसंडी होती. त्यांनतर जेंव्हा इतर लोक घरी येऊन प्रियंकाच्या खेळाचे कौतुक करायचे तेंव्हा आपल्या लेकीचा आईला विशेष अभिमान वाटायचा.
आपल्या यशाचे श्रेय ती मार्गदर्शक अविनाश करवंदे सरांना देते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज यशाचे शिखर गाठता आले. पालकांची भूमिकाही तेवढीच महत्वाची होती. त्यांनतर तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयात प्रवेश घेतला व खो-खो चा नवा अध्याय सुरू झाला. खो-खो खेळातील एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून प्रियंका इंगळे हे नाव राज्यभर नावारूपाला आले होते. २०२१-२२ सालच्या महिला गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीने तिला राणी लक्ष्मीबाई या पुरस्कारान गौरविण्यात आले. शालेयस्तरापासून सुरू झालेला खो-खो चा प्रवास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचाच हे ध्येय ठेवून सराव चालू ठेवला होता. आणि ती वेळ आलीच जेंव्हा तिची २०२२-२३ च्या चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. हा मी क्षण कधीच तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. एकूण २३ राष्ट्रीय स्पर्धा, १८ सुवर्णपदके ही खो-खो खेळाने दिलेली संपत्ती इतर कोणत्याही दागिन्यांपेक्षा खूप मोठी आहे.
खो-खो खेळातील सर्वोत्तम कामगिरी साठी प्रियंकाला मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्य शासनाचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२-२३ साली मिळाला. अविनाश किसन करवंदे या गुरूंच्या चरणी ती आदराने नतमस्तक होते कारण आज त्यांच्याशिवाय हे सगळं वैभव उभं करू शकले नसते, त्यांच्यामुळे मला एवढे नावलौकिक मिळाला अशी तिची भावना आहे.
सध्या खो-खो खेळणाऱ्या मुलींना संदेश देताना ती सांगते की खो-खो हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे. आज या खेळातून शासकीय नोकरीच्या थेट नियुक्तीसाठी ३२ जण पात्र ठरले आहेत.
आज महाराष्ट्र राज्य शासनाची गट ब राजपत्रित क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून माझी निवड झाली. मी खो-खो खेळते याचा मला खूप अभिमान आहे आपण सर्वांनी खो-खो खेळाला असेच पुढे घेऊन गेले पाहिजे एवढाच मी संदेश देते. मी खो-खो खेळते याचा मला खूप अभिमान आहे.. !
प्रियंका इंगळेचा खो-खो प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. खेळून काय होतं ? असा प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर हे प्रियंकाने मिळवलेले यश आहे. नवरात्री उत्सवातील ही दुसरी नवदुर्गा ! तिला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !!
संकलन
डॉ. राजकुमार देशमुख
#जागर_नवरात्रीचा
#सन्मान_खो_खो_कन्येचा
#खो_खो #नवदुर्गा