09/09/2026
◆ गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीचा गौरव; महाविद्यालयाचा शिरपेचात मानाचा तुरा; शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे “उत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय पुरस्कार २०२५” प्रदान; महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण.. ◆
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे “उत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे २०२५-२६ चे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये/परिसंस्था/प्रशाळा, प्राचार्य, शिक्षक, संशोधक शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी आणि केंद्रीय मूल्यांकन प्रकल्प राबविणारे उत्कृष्ट महाविद्यालये यांच्या कार्याचा गौरव विद्यापीठाच्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भवनातील सभागृह येथे विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्ताने कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १९ ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे चे कुलगुरू प्रा.सुरेश वा.गोसावी, कबचौउमविचे कुलगुरू प्रा. विजय ल. माहेश्वरी, कबचौउमविचे प्र-कुलगुरू डॉ.सोपान तु. इंगळे, कबचौउमविचे कुलसचिव डॉ.विनोद प. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने व्यावसायिक महाविद्यालय पुरस्कार गटातून शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी “उत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय पुरस्कार २०२५” बहुमान मिळवत पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री जगदीश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.पी.पवार, प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांना प्रदान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे शैक्षणिक अंकेक्षणात महाविद्यालयास सलग सहाव्यांदा 'अ' दर्जा प्राप्त झाला आहे. यामध्ये अध्यापनाची गुणवत्ता, संशोधन उपक्रम, विद्यार्थी विकास कार्यक्रम तसेच संस्थेची एकूण शैक्षणिक प्रगती यांचे सर्वंकष मूल्यमापन करून हे मानांकन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांमधून सक्षम नागरिक घडविण्याचे उपक्रम, विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या, विविध परीक्षांचे निकाल, महाविद्यालय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, राबवित असलेल्या विद्यार्थी हिताच्या योजना, महाविद्यालयात उपलब्ध सोयी - सुविधा, महाविद्यालयातील संशोधन उपक्रम, प्राध्यापकांनी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात नोंदविलेला सहभाग व सादर केलेले शोधनिबंध, अद्ययावत ग्रंथालय सुविधा, सामाजिक उपक्रम, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा, महाविद्यालयाने विद्यार्थी केंद्र बिंदू ठेवून त्यात शैक्षणिक सोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, संशोधन, युवारंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे योगदान, विविध प्लेसमेंट मुलाखती द्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले होते त्या अनुषंगाने हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कुलगुरूंनी गठित केलेल्या समितीने विद्यापीठाला प्राप्त झालेले अर्ज व त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची खातरजमा करून महाविद्यालयास “उत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला आहे. महाविद्यालयाला वर्ष २०२२ मध्ये नॅककडून "अ" दर्जा प्राप्त झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील औषधनिर्माणशास्त्र शाखेतून नॅकला सामोरे जात "अ" दर्जा प्राप्त करणारे हे महाविद्यालय कबचौ उमवि कार्यक्षेत्रातील 3.15 सीजीपीए प्राप्त करणारे एकमेव महाविद्यालय, नवी दिल्ली येथील एआयसीटीई, नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडेशनने (एनबीए)ची मान्यता, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) तर्फे 2(f) & 12(B) चे मानांकन प्राप्त महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात (अॅकॅडमिक ऑडिटात) सलग सहाव्यांदा मान मिळवत 'अ' श्रेणीचे महाविद्यालय असून विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांना कबचौउमवि तर्फे शैक्षणिकवर्ग २०२४-२५ मध्ये “उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार २०२४” विद्यापीठाकडून मिळाला आहे. या उत्तुंग यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, मंडळाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांचे अभिनंदन व समाधान व्यक्त केले आहे. महाविद्यालयाच्या गुणवत्तावृद्धीसाठी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व घटकांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांनी सर्वांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली.